गडचिरोली

गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने नागरिकांच्या हरवलेल्या व चोरीला गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. कुरखेडा पोलीस स्टेशनच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सातत्यपूर्ण तपास आणि सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने हरवलेले व चोरीला गेलेले एकूण ११ मोबाईल फोन शोधून काढत ते संबंधित मूळ मालकांना परत सुपूर्द केले. या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत रु. २ लाख इतकी आहे.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र प्रवासादरम्यान किंवा निष्काळजीपणामुळे मोबाईल हरवणे अथवा चोरीला जाण्याच्या घटना वाढत आहेत. अशा मोबाईलचा गैरवापर करून सायबर गुन्हे घडण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले होते.
या निर्देशानुसार पोलीस स्टेशन कुरखेडा येथे नोंद झालेल्या तक्रारींचा सखोल तपास करण्यात आला. तपास पथकाने विविध तांत्रिक साधनांचा आणि सीईआयआर (CEIR) प्रणालीचा प्रभावी वापर करून विविध ठिकाणांहून ११ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळविले.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दि. १० जुलै २०२६ रोजी कुरखेडा पोलीस स्टेशन येथे संबंधित मूळ मालकांना मोबाईल फोन परत देण्यात आले. हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलाचे मनापासून आभार मानत पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले.
सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन
सध्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून, मोबाईल चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोबाईल हरवताच किंवा चोरीला गेल्यास विलंब न करता संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच सीईआयआर (CEIR) पोर्टलवर मोबाईल ब्लॉक करण्यासाठी नोंदणी करावी आणि आवश्यक ती माहिती सायबर पोलीस स्टेशनला द्यावी, असे आवाहन गडचिरोली पोलीस दलाने केले आहे.
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात मसपोनि. प्रियंका राजकुमार आघाव तसेच पोअं. पंकज नवघरे आणि कुरखेडा पोलीस पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ केला आहे.





