सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील अस्थिशल्यचिकित्सा विभागात 13 वर्षीय बालिकेवर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. हिप रिप्लेसमेंट करण्यात आलेली ही भारतातील सर्वात लहान रुग्ण असून यापूर्वी मार्च 2023 मध्ये दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये 14 वर्षीय मुलावर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची नोंद आहे, असे अस्थिशल्यचिकित्सक डॉ. हितेंद्र वांबोरीकर यांनी सांगितले
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील चिकाळा गावातील निवासी अलेशा मनपूर्वे ही 13 वर्षांची मुलगी फळे तोडताना शेतातील झाडावरून खाली पडली. खाली पडल्यामुळे तिला दुखापत झाली. तिच्यावर जवळच्या दवाखान्यात उपचार करण्यात आले. तात्पुरत्या उपचाराने तिला बरे वाटत असले तरी या अपघातानंतर तिला वर्गात बसताना त्रास होऊ लागला. अलेशाच्या वडिलांनी नांदेड येथील एका खाजगी दवाखान्यात तिला दाखविले व डॉक्टरांच्या सल्ल्याने तेथे एमआयआर करून घेतला.
एमआयआर तपासणीत अलेशाच्या कंबरेतील खुब्याच्या सांध्यांमधील हाडाच्या बॉलला इजा झाल्याचे दिसून आले. ही शस्त्रक्रिया वयाच्या विशीनंतरच होईल आणि शस्त्रक्रियेसाठी लाखाने खर्च येईल, असे सांगण्यात आल्यामुळे अलेशाचे वडील चिंताग्रस्त झाले. काही दिवसांपूर्वी या भागातील सामाजिक कार्यकर्ते बाबुराव कोहळीकर यांनी सावंगी (मेघे) रुग्णालयाचे एक शिबिर आपल्या परिसरात घेतले असल्याने त्यांनी अलेशाच्या वडिलांना सावंगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
सावंगी रुग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. हितेंद्र वांबोरीकर यांनी अलेशाची तपासणी केली तसेच वैद्यकीय रिपोर्ट बघून तिच्या वडिलांना उपचारांबाबत माहिती दिली. या दुखापतीमुळे कायमचे अपंगत्व येऊ नये म्हणून हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया हाच पर्याय असल्याचे सांगितले. लहान वयाच्या रुग्णावर ही शस्त्रक्रिया करणे डॉक्टरांसाठीही आव्हान असून हिप रिप्लेसमेंटसाठी लागणारे कृत्रिम सांधे व अन्य सामग्री सहसा उपलब्ध नसते.
पालकांनी परवानगी दिल्यानंतर प्रत्यारोपणाची सामग्री उपलब्ध होताच डॉ. हितेंद्र वांबोरीकर यांनी बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. करुणा ताकसांडे, सहाय्यक अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुप्रतिम रॉय, डॉ. विशाल कलबुर्गी यांच्या सहकार्याने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्णत्वाला नेली. भरतीदरम्यान मनपूर्वे कुटुंबाला कुठलाही रुग्णालयीन खर्च लावण्यात आला नाही. ही महागडी शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णतः मोफत करण्यात आली.