माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम होड्रीत भव्य व्हॉलीबॉल व कबड्डी क्रीडा स्पर्धेचे उत्साहात शुभारंभ.
*अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी.*
*गावाच्या विकासासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा- राजे अम्ब्रिशराव महाराज*
*भामरागड:-* गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल भामरागड तालुक्यातील होड्री येथे जय काटेकोसा क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल व कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.यावेळी मंचावर युवानेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम,अर्जुन आलाम भाजपा तालुका अध्यक्ष भामरागड, विकास तोडसाम भाजप तालुका अध्यक्ष अहेरी, वैभव सोमकुंवर, राकेश कोसरे, सुनील बिश्वास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, तापेस हलदार नगर उपाध्यक्ष भामरागड, भिक्का विडपी गाव पाटील,ज्ञानेश्वर भांडेकर, कवीश्वर मोतकूरवार,गुलशन भांडेकर,रैनू तिम्मा,झाकीर हुसैन आदी उपस्थित होते.आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे आणि अपेक्षित पाऊस न झाल्याने अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिरोंचा या पाच तालुक्यांतील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पावसाच्या लहरीपणाचा परिणाम खरीप हंगामातील धानपिकांवर झाला असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व दिलासा द्यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी होड्री गावातील नागरिकांचे विशेष कौतुक करताना राजे अम्ब्रिशराव महाराज म्हणाले की, अतिदुर्गम भागात अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणे ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे गावातील युवक, नागरिक आणि लहान मुले एकाच व्यासपीठावर येतात. यातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि एकजूट अधिक मजबूत होते. युवकांनी केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित न राहता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा, गावातील समस्या सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
*राज्यस्तरीय खेळाडूंचा गौरव*
या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे होड्री गावातील दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धेत सहभाग नोंदविल्याबद्दल राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अतिदुर्गम भागातून राज्यस्तरापर्यंत मजल मारणाऱ्या या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्येही मोठी गुणवत्ता असून त्यांना योग्य प्रोत्साहन आणि संधी मिळाल्यास ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*विजेत्या संघांसाठी भरघोस पारितोषिके*
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या क्रीडागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. व्हॉलीबॉल स्पर्धेतील प्रथम पारितोषिक २५ हजार १ रुपये माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्याकडून, द्वितीय पारितोषिक २० हजार १ रुपये राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्याकडून, तर तृतीय पारितोषिक १५ हजार १ रुपये युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांच्याकडून देण्यात येणार आहे.
अतिदुर्गम होड्री गावात आयोजित या क्रीडा स्पर्धेमुळे परिसरातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण व आदिवासी भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासोबतच सामाजिक एकजूट बळकट करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.




