पावसाळा सुरू होताच गडचिरोली जिल्ह्यातील जंगल, डोंगराळ आणि दुर्गम भाग विविध प्रकारच्या दुर्मीळ रानभाज्यांनी बहरून जात आहेत. निसर्गाच्या कुशीत कोणत्याही रासायनिक खतांशिवाय नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या या रानभाज्या पौष्टिक, औषधी गुणधर्मांनी समृद्ध असल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग ठरतात. याचबरोबर त्यांच्या विक्रीमुळे अनेक कुटुंबांना हंगामी उत्पन्नाचाही आधार मिळत आहे.
पावसाळ्याच्या प्रारंभापासूनच अनुभवी आणि जाणकार नागरिक जंगलात जाऊन विविध रानभाज्यांचे संकलन करतात. जूनपासून सुरू होणारा हा हंगाम दिवाळीपर्यंत चालतो. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये या भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असून पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
जिल्ह्यात तरोटा, अरसफरी, कोलहरी, शेरडिंग, भारंगी, कुई, आळंबी (भरसाळा), साळुंई, आळू, आस्टेला, मोकरी, तरळी, वाघाचे, शेंगशिंगा, तरसाळू, कुड्याची फुले, टाकळा, बुक्का, रान अंबाडी, रानमाठ, चिवळ, तांदुळजा, चोळ, फोडशी, टेंभळ, कोळभाजी, रान कांदा, रान मेथी, रान पालक, कुंडेमुंगी, लाजाळूची कोवळी पाने, कोटेमाठ अशा अनेक प्रकारच्या रानभाज्या आढळतात. मात्र, अनेकांना त्यांची ओळख नसल्यामुळे या नैसर्गिक संपत्तीचा पुरेसा उपयोग होत नाही.
ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिक या रानभाज्या गोळा करून आठवडी बाजारात विक्रीसाठी आणतात. शहरांमध्ये नैसर्गिक रानभाज्यांची उपलब्धता कमी असल्याने ग्राहकांकडून त्यांना मोठी मागणी असते. परिणामी पावसाळ्यात अनेक कुटुंबांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो आणि स्थानिक अर्थचक्रालाही चालना मिळते.
आरोग्याच्या दृष्टीनेही या रानभाज्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्व ‘ए’ आणि ‘सी’, तंतुमय पदार्थ (फायबर) तसेच विविध सूक्ष्म पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास, कुपोषण कमी करण्यास आणि संतुलित आहार राखण्यास त्यांचा मोठा फायदा होतो.
जाणकारांचा महत्त्वाचा सल्ला
जंगलात उगवणाऱ्या सर्वच वनस्पती खाद्ययोग्य नसतात. काही वनस्पती दिसायला सारख्या असल्या तरी त्या विषारी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रानभाज्यांची अचूक ओळख करूनच त्यांचा वापर करावा. अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच रानभाज्या गोळा करून आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला जाणकारांनी दिला आहे.





