
गडचिरोली, : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत भामरागड तालुक्यातील चिचोळा येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर महिला शेतीशाळेचा पहिला वर्ग १० जुलै रोजी उत्साहात आयोजित करण्यात आला. नैसर्गिक शेतीचा प्रसार, हवामान बदलाच्या परिस्थितीत शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब आणि खरीप हंगामाचे योग्य नियोजन याबाबत महिला शेतकरी व ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शेतीशाळेमध्ये दशपर्णी अर्काची निर्मिती व उपयोग, बियाण्यांची बीज प्रक्रिया, पेरणीपूर्व मशागत तसेच एल-निनो चा शेतीवर होणारा परिणाम आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक शेती व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, उपस्थित ग्रामस्थांना विषय सहज समजावा यासाठी कृषीताईंकडून स्थानिक माडिया भाषेत संवाद साधत मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध शंकांचे निरसन करून घेतले.
नैसर्गिक शेतीच्या विविध तंत्रांचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी होण्यास, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळण्यास मदत होईल, असे यावेळी मार्गदर्शनात सांगण्यात आले. तसेच खरीप हंगामाचे योग्य नियोजन करून हवामानातील बदलांचा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास सहाय्यक कृषी अधिकारी डेव्हिड पुंगाटी, समूह सहाय्यक गौरव धोटे व सुधांशू खंडाळ, कृषीताई कोमल गावडे तसेच चिचोळा गावातील महिला शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





