ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

श्रमदानातून गणेशनगर येथे वनराई बंधारा जलसंधारणासाठी कृषी विभागाचा पुढाकार; अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

श्रमदानातून गणेशनगर येथे वनराई बंधारा जलसंधारणासाठी कृषी विभागाचा पुढाकार; अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

मुलचेरा : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मुलचेरा यांच्या वतीने जलसंधारण व मृदसंधारणाच्या उद्देशाने मौजा गणेशनगर येथे श्रमदानातून वनराई बंधारा तयार करण्यात आला. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या उपक्रमात तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जलसंधारणासाठी उपयोग व्हावा, यासाठी वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली.

वनराई बंधाऱ्यामुळे परिसरातील पाण्याचा साठा वाढण्यास तसेच पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. परिणामी भूजल पातळीत वाढ होऊन परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी उप कृषी अधिकारी मनोहर दुधबावरे, सहाय्यक कृषी अधिकारी श्याम जाधव, प्रकाश पेंदाम, रोहित कोडापे, शंकर कुमरे, विनायक केकाण, लीलाधर परचाके, नितेश घुगे, प्रणय राडे तसेच परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास पाणीटंचाईवर मात करण्यास मोठी मदत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी जलसंधारणाच्या विविध कामांमध्ये पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात श्रमदान करावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मुलचेरा यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिक व शेतकरी बांधवांनी स्वागत केले.