राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत कृषी सखींसाठी २४ जुलै रोजी एकदिवसीय वेबिनार
कर्तव्य, जबाबदाऱ्या, नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान व पीक व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

गडचिरोली, (जिमाका) : प्रकल्प संचालक, आत्मा (ATMA), गडचिरोली यांच्या वतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान २०२५-२६ व २०२६-२७ अंतर्गत निवड करण्यात आलेल्या कृषी सखींसाठी २४ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता एकदिवसीय ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. नैसर्गिक शेतीचा प्रसार, कृषी सखींची भूमिका अधिक प्रभावी करणे आणि शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन सक्षमपणे उपलब्ध करून देणे हा या वेबिनारचा प्रमुख उद्देश आहे.
या वेबिनारमध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत निवडलेल्या कृषी सखींची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, पुढील आठवड्यातील कामांचे नियोजन, शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीचे महत्त्व प्रभावीपणे पोहोचविण्याच्या पद्धती, पावसाच्या खंडकाळात पिकांच्या सुरुवातीच्या व मध्य अवस्थेतील नैसर्गिक पद्धतीने पीक व्यवस्थापन, मृदा ओलावा संवर्धन तंत्रज्ञान, जलसंधारण उपाययोजना तसेच प्रश्नोत्तर व शंका समाधान या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
वेबिनारमध्ये डॉ. किशोर झाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर (गडचिरोली), श्री. रवि हरणे, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, गडचिरोली तसेच नैसर्गिक शेती तज्ज्ञ श्री. वामन बोरकुटे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प संचालक, आत्मा, गडचिरोली श्रीमती प्रीती हिरळकर राहणार आहेत.
सदर वेबिनारला सर्व कृषी सखी, बीटीएम (BTM), एटीएम (ATM), कृषी अधिकारी तसेच संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी यांनी उपस्थित राहणे आवश्यक असून, वेबिनारमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा, गडचिरोली यांनी केले आहे.
वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी पुढील Google Meet लिंकचा वापर करावा : https://meet.google.com/vgt-iiae-yky





