अध्याय नववा
माणसाला हे जग खरे आहे असे वाटत असते आणि त्याला अनुसरून तो स्वत:च्या वस्तूंवर मालकी हक्क दाखवत असतो. भगवंत म्हणतात मुळातच ह्या जगाचे अस्तित्व नाही समोर दिसणारे जग हा केवळ भास आहे कारण सर्व जग जर त्यांनीच व्यापलंय तर इतरांना त्यात जागा कुठून असणार? मात्र त्यांचा हा दिव्ययोग ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांना मात्र इतर सर्वांचे अस्तित्व जाणवते. ह्या अर्थाचा
न वा भूते हि माझ्यात माझा हा दिव्य योग की । करितो धरितो भूते परी त्यात नसे कुठे ।।5 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत.
जगाचे अस्तित्व हा केवळ भास आहे हे स्पष्ट करताना माउली म्हणतात, अंधारात असलेल्या दोरीला मनुष्य साप समजतो पण त्यावर उजेड पडला की तिच्या ठिकाणी होणारा सापाचा भास नाहीसा होऊन ती दोरी आहे हे लक्षात येते, त्याप्रमाणे हे जग खरे आहे असे भासवणारे अज्ञान नाहीसे झाले की, समोर दिसणारे जग हा केवळ भास आहे हे समजते.
मातीतून तयार होणारी निरनिराळ्या आकाराची भांडी हा कुंभाराच्या बुद्धीच्या कल्पनेचा अविष्कार असतो. अथवा समुद्राच्या पाण्याचे रूपांतर लाटात होणे ही वाऱ्याची करणी असते. कापसाची वस्त्रs करणे हे विणकराच्या कल्पनेतून घडते तसेच सोन्याचे अलंकार घडवणे हे सोनाराचे काम आहे. असं जरी असलं तरी त्या सगळ्याच्यामागे असलेले मुलतत्व आहे तसंच असतं पण माणसाच्या समोर ते वस्त्रांच्या किंवा अलंकाराच्या रुपात आल्याने ते त्याला मुलतत्वापेक्षा वेगळे आहे असे वाटते पण तो केवळ भासच असतो. ज्याप्रमाणे आपल्या आवाजामुळे येणारा प्रतिध्वनी किंवा आपण आरशात डोकावल्यावर दिसणारे आपले प्रतिबिंब हा भास असतो त्याप्रमाणे समोर दिसणारे माणसांचे आणि वस्तूंचे निरनिराळे आकार हा निव्वळ भास असतो. अज्ञानामुळे ज्याला हे विश्व खरे आहे असे वाटते त्याला हा भास आहे हे समजत नाही. त्यामुळे तो सर्वत्र भरून राहिलेल्या भगवंतांच्या शुद्ध स्वरूपात भूतांचे अस्तित्व पाहतो पण ज्ञानी माणसाच्या दृष्टीने तो केवळ भास असतो. ज्याचे अज्ञान दूर होते त्याला माझे अस्तित्व सर्वत्र जाणवत असल्याने तो आत्मसुखात डुंबत असतो आणि त्याचे हे सुख कधीही नष्ट न होणारे तसेच कधीही कमी न होता कायम काठोकाठ भरलेले असते.
आपल्याला कितीतरी भास होत असतात. त्यामुळे आपल्याला समोर दिसणारी दुनिया खरी आहे असे वाटते. माउली म्हणतात, आपण आपल्या भोवती गरगर फिरले असता अंगात भोवळ आल्यामुळे जसे भोवतालच्या भिंती नदीचा काठ वगैरे सर्व काही इकडे तिकडे फिरल्यासारखे दिसते, नावेतून निघाले असता काठावरची झाडे मागे धावत असल्याचा भास होतो. त्याप्रमाणे माणसाला भगवंतांच्या अखंड स्वरूपात भूते आहेत असा भास होतो. ती कल्पना जो मागे टाकेल त्याला स्वप्नातसुद्धा भगवंत प्राण्यात अथवा प्राणी त्यांच्यात आहेत असे वाटणार नाही. ह्या विश्वाची निर्मिती भगवंतांनी केली असल्याने ते विश्वाचा आत्मा आहेत.
क्रमश:





