Uncategorized

समाज एकत्र झाला तर राष्ट्रकार्य घडेल!

शिवव्याख्याते सौरभ करडे : यावर्षीच्या दुर्गामाता दौडची सांगता

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

हिंदू धर्म पोखरून तो जातीपातीत कसा विभागला जाईल? यासाठी एक वर्ग काम करत आहे. परंतु समाज एक झाला तरच राष्ट्रकार्य घडू शकते. त्यामुळे आपापसात न विभागता देशाच्या रक्षणासाठी आपल्यामध्ये एकी असणे गरजेचे आहे आणि ही एकी बिघडवणाऱ्यांना वेळीच बाहेरचा रस्ता दाखवावा, असे प्रतिपादन शिवव्याख्याते सौरभ करडे यांनी केले.

मंगळवारी दुर्गामाता दौडच्या सांगता समारंभात ते बोलत होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे झालेल्या या सांगता कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने धारकरी उपस्थित होते. यावेळी सौरभ करडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मप्रेम, जातीपातीत बरबटलेल्या समाजामुळे संत चोखामेळा यांना विठ्ठलाचे दर्शनही घेता आले नव्हते. या उदाहरणाद्वारे राष्ट्रप्रेमाची व्याख्या समजावून सांगितली.

28 वर्षांपासून शहरात शिस्तबद्धरीत्या दुर्गामाता दौड

प्रांतप्रमुख किरण गावडे म्हणाले, मागील 28 वर्षांपासून बेळगाव शहरात शिस्तबद्धरीत्या दुर्गामाता दौड फिरते. भगव्या ध्वजाचे गल्लोगल्ली व स्वयंस्फूर्तीने स्वागत केले जाते. 23 जणांनी सुरू केलेल्या या दौडमध्ये आता 35 ते 40 हजार तरुण सहभागी होत आहेत. दौडच्या पहिल्या दिवशी झालेला गोंधळ हा गैरसमजातून झाला. त्याबाबत दिलगिरीही व्यक्त केली. परंतु त्यानंतरही भगव्या ध्वजाचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे यापुढे यायचे असेल तर सोबत या, अन्यथा तुमचा तुम्हाला मार्ग मोकळा असेल, अशा शब्दात त्यांनी खडसावले.

मंगळवारी मारुती गल्ली येथील मारुती मंदिरापासून दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला. पुणे येथील शिवव्याख्याते सौरभ करडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यानंतर भगवा ध्वज चढवून दौडला प्रारंभ झाला. देशपांडे गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, कोनवाळ गल्ली, केळकरबाग, समादेवी गल्ली, कंग्राळ गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली या भागात जल्लोषात स्वागत करण्यात आले. शेवटी धर्मवीर संभाजी चौक येथील शंभूतीर्थ येथे दौडची सांगता झाली.

सूत्रसंचालन गजानन निलजकर यांनी केले. जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी आभार मानले. व्यासपीठावर शहरप्रमुख अनंत चौगुले, तालुकाप्रमुख परशुराम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

बेळगावमध्ये शिवभक्तीचे स्फुरण

बेळगावमधील शिवभक्तांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रती निस्सीम भक्ती आहे. त्यामुळेच महाराष्ट्रापेक्षाही मोठी दौड बेळगावमध्ये होते. मागील अनेक वर्षांपासून या दौडमध्ये सहभागी होण्याचा सन्मान मिळत असल्याने ही एक आवड निर्माण झाली असून, दरवर्षी बेळगाव विभागातील एखाद्या तरी दौडला भेट देऊन येथील युवकांना मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे पंढरपूरची वारी, दुर्गवीर रायगडाची वारी आणि बेळगावच्या दुर्गामाता दौडची वारी ही कधीही चुकवू नये, अशा शब्दात सौरभ करडे यांनी शिवभक्तांना मार्गदर्शन केले.