नेहमीच सडेतोडपणे आपले विचार मांडणारे सरसंघचालक मोहन भागवत यांनी, नागपूर येथे आयोजित दसरा मेळाव्यात अनेकांना चांगल्या कानपिचक्या दिलेल्या आहेत. देशामध्ये निवडणुकीचे निमित्त काढून, निवडणूक आयोगाला उद्देश करून, जी काही आंदोलने घडविण्यात आली, त्याबद्दल मोहन भागवत यांनी आंदोलकांना, आपली आंदोलने ही समस्या सोडविण्यासाठी असावीत आणि तोच उद्देश असावा, ‘देश प्रथम’ हे अगोदर उद्दिष्ट असणे आवश्यक आहे, असा सल्ला दिलेला आहे.
देशामध्ये अलीकडे जी काही आंदोलने चालू आहेत, त्यातून देशात अराजकता माजविण्याचा काही शक्तींचा प्रयत्न होता. आंदोलनामुळे सामाजिक दरी वाढावी, असे प्रयत्न अलीकडच्या काळामध्ये होतात, याबद्दल ते चिंता व्यक्त करतात. सार्वजनिक व्यवहारातील सभ्यतेच्या मर्यादा प्रत्येकाने पाळल्या पाहिजेत आणि आंदोलनामागे समाज तथा देशाप्रति आपलेपणाची भावना असणे आवश्यक आहे. आंदोलन हे राजकारणाचे साधन बनले किंवा त्यामागे विरोधी समूहाबद्दल शत्रुभाव निर्माण झाला तर त्यातून सामाजिक दरी वाढण्याची शक्यता असते, असे अनेक विचार भागवतांनी मांडलेले आहेत. भागवतांच्या या दसरा मेळाव्याच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून असते. भागवत नेमके काय बोलणार! हे फार महत्त्वाचे असते. केंद्रात काँग्रेसचे राज्य असताना भागवत हे नेहमीच केंद्रातील सत्ता पक्षावर तुटून पडायचे. 2014 मध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आले. सुऊवातीला त्यांनी पहिल्या वर्षी देशाच्या जनतेचे आभार मानले आणि एक अतिशय चांगला निर्णय जनतेने घेतला म्हणून त्यांनी जनतेचे स्वागत केले. त्याचबरोबर केंद्रातील भाजपच्या सरकारलादेखील सत्ता आली, ती डोक्यात जाऊ नये, असा सल्ला दिला होता. त्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये भागवत यांनी, केंद्रातील आणि राज्यातील सरकारांना देखील जोरदार चिमटे काढणे, कानपिचक्या देणे कमी केले नाही. मंगळवारी दसरा मेळाव्यामध्ये त्यांनी केंद्राला देखील, सर्वांना एकत्र आणण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी, या देशात राहणाऱ्या प्रत्येकाला या देशाचे अधिकार प्राप्त झाले पाहिजेत, सर्वांनाच समान अधिकार आहे, याचा पुनरुच्चार केला. भारत आज जगात फार मोठी प्रगती करीत आहे आणि या देशाचा विकास जेवढा होत राहील, त्याचा काही देशांना त्रासही होईल. भारत शक्तिशाली देश बनू नये यासाठी काही राष्ट्रांचा प्रयत्न आहे, असे निवेदन भागवत यांनी कोणत्याही देशाचे नाव न घेता केले. याचा अर्थ, देशामध्ये सध्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून वातावरण बिघडवण्याचा काही शक्ती प्रयत्न करीत आहेत, त्या शक्तीला विदेशातून मदत मिळत असावी, असा संशयही त्यांनी व्यक्त केलेला आहे. भारत आणि हिंदू समाज यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचे प्रयत्न काहीजण करू पाहत आहेत व त्यातूनच देशात सत्तापालट करण्याची स्वप्नं काहीजण रंगवित आहेत परंतु त्यांचा डाव यशस्वी होऊ शकत नाही, असेही भागवत यांनी म्हटले. भागवत नेहमीच विचारपूर्वक निवेदने करीत असतात. आंदोलन करणाऱ्यांना त्यांनी सावधानतेचा इशारा दिलेला आहे. आंदोलने लोकशाहीमध्ये होतातच परंतु त्या पाठीमागे जनकल्याण व्यतिरिक्त इतर कोणतेही उद्देश असू नयेत, अन्यथा अशी आंदोलने देशहिताच्या आड येतात आणि अशा आंदोलनाला विदेशी शक्ती मदत करतात. तेव्हा आंदोलनाचा उद्देश हा केवळ समाजातील बिघडत्या व्यवस्थेला सरळ करण्यासाठी, त्याचबरोबर देशाला आणि देशाच्या अखंडतेला कोणतीही बाधा होणार नाही, याची दखल घेण्याचे आवाहन केले. आंदोलने का होतात, हे अगोदर लक्षात घ्या आणि अशी आंदोलने होऊ नयेत, यासाठी सरकारचे प्रयत्न आवश्यक आहेत, असे सांगत सरसंघचालकांनी सरकारचे देखील कान पकडलेले आहेत. अलीकडच्या काळामध्ये सरसंघचालकांची भूमिका पाहता त्यांच्या स्वत:मध्ये परिवर्तन झाले आहे की काय, असा प्रश्न साहजिकच उपस्थित राहतो. कट्टर हिंदुत्ववाद अलीकडे संघचालकांकडून थोडा बाजूला पडत आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे त्यांनी स्वीकारलेले धोरण पाहता, संघाच्या एकंदरीत धोरणात होत असलेले बदल, हे निश्चितच स्वागतार्ह ठरतात. संघ बदलला का! असा प्रश्न कोणीही निर्माण करू शकतो. प्रत्यक्षात संघामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत परंतु प्राप्त स्थितीमध्ये जर थोडे-फार परिवर्तन केले नाही तर त्याचे भविष्यात दूरगामी परिणाम होत राहतात आणि देशाच्या अखंडतेला कोणतीही बाधा होऊ नये, या उद्देशानेच संघाने आपल्या धोरणामध्ये काही सुरू केलेले नवे बदल, हे आधुनिक विचारांशी जोडलेले नाते आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. सरसंघचालकांनी अलीकडच्या काळात त्यांनी, सर्वांना बरोबर घेऊन चला, असा सल्ला हिंदुत्ववाद्यांना देखील दिलेला आपण पाहतो. सरकारला देखील काहीवेळा त्यांच्या धोरणामध्ये किंचित बदल करण्यास देखील त्यांनी सांगितलेले होते. कट्टरतावाद सर्वांनीच संपविणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने मोहन भागवत यांनी जे काही सल्ले सरकारला असो वा नागरिकांना दिले ते पाहता परिवर्तनाच्या दिशेने आता संघदेखील महत्त्वाचे पाऊल उचलत आहे, हे नक्की.




