
गडचिरोली, दि. १८ : महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने नागरिकांना पारदर्शक, जलद व सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध सेवा पूर्णपणे ऑनलाइन केल्या आहेत. या सुविधांमुळे आता नागरिकांना सातबारा, ८-अ उतारा, प्रॉपर्टी कार्ड, ई-फेरफार अर्ज, जमीन मोजणीसाठी अर्ज, ई-नकाशा, नोंदींची पडताळणी तसेच अर्जाची ऑनलाइन स्थिती यांसारख्या सेवा घरबसल्या मिळू शकतात.
डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महसूल व भूमी अभिलेखाशी संबंधित कामे अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने होत असून, नागरिकांचा वेळ व खर्च दोन्हीची बचत होत आहे. कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी झाली असून, सर्व सेवा अधिकृत संकेतस्थळांवरून सहज उपलब्ध आहेत.
ऑनलाइन उपलब्ध सेवा :
डिजिटल सातबारा
डिजिटल ८-अ उतारा
प्रॉपर्टी कार्ड
ई-फेरफार अर्ज
जमीन मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज
ई-नकाशा
भूमी अभिलेख नोंदीची पडताळणी
अर्जाची ऑनलाइन स्थिती पाहण्याची सुविधा
भूमी अभिलेख विभागाने नागरिकांना केवळ अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी अनधिकृत संकेतस्थळांवर वैयक्तिक माहिती किंवा कागदपत्रे अपलोड करू नयेत, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
अधिकृत संकेतस्थळे :
mahabhumi.gov.in
digitalsatbara.mahabhumi.gov.in
emojini.mahabhumi.gov.in
जमिनीसंबंधी आवश्यक कागदपत्रे, नकाशे, फेरफार, मोजणी व इतर सेवांसाठी नागरिकांनी या ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भूमी अभिलेख विभागामार्फत करण्यात आले आहे. शासनाच्या ‘आपले सरकार’ उपक्रमांतर्गत नागरिकांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि सुलभ सेवा देण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.





