कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजगाव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि ग्रंथालयाचे वाचक आर. के. सावंत, तसेच नितीन सोनाळकर उपस्थित होते. ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा मीरा कासार यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. ग्रंथालय समितीचे सदस्य तथा माजी उपसरपंच संजय विठ्ठल कानसे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. यानंतर वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व आणि वाचनाची समाजाच्या जडणघडणीतील भूमिका यावर कार्यक्रमातून भर देण्यात आला.
उत्कृष्ट वाचक आणि बालवाचकांचा सन्मान
ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचनाची आवड जोपासणाऱ्या आणि वाचन संस्कृतीला हातभार लावणाऱ्या वाचकांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला. उत्कृष्ट वाचक म्हणून भरत कृष्णा सावंत भोसले, सुप्रिया उदय सुतार आणि रूपाली अजित तारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच उत्कृष्ट बालवाचक म्हणून गार्गी निलेश माजगावकर आणि दक्ष सुभाष सावंत यांचा गौरव करण्यात आला. या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट देण्यात आली. वाचनाची सवय ही व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाची असून, लहान वयातच मुलांमध्ये पुस्तकांविषयी आवड निर्माण होणे आवश्यक आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याला उजाळा
वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचे स्मरण करण्यात आले. माजगाव येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 चे मुख्याध्यापक बांदेकर सर, प्रिया सुतार आणि भरत सावंत भोसले यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनप्रवासाचा आणि कार्याचा आढावा घेत त्यांना आदरांजली वाहिली.
ग्रंथालयाचे अध्यक्ष चंद्रकांत मुकुंद सावंत गुरुजी आणि समिती सदस्या शितल सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले. ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचकांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आणि समाजात वाचन संस्कृती रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रंथालयाच्या कार्याचे कौतुक
या कार्यक्रमाला ग्रंथालय समितीचे सदस्य, मान्यवर वाचक, शिक्षकवर्ग, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शितल सावंत यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रंथपाल मधु कुंभार, लिपिका रोशनी निबरे आणि सेविका माया साळगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्कृष्ट वाचकांचा सन्मान, विद्यार्थ्यांचे पुस्तकवाचन आणि डॉ. कलाम यांच्या विचारांचे स्मरण अशा विविध उपक्रमांमुळे माजगाव पंचक्रोशी मानव विकास ग्रंथालयाचा वाचन प्रेरणा दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.





