ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्देश; १५ नोव्हेंबरपूर्वी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करा

गडचिरोली

गडचिरोली : राज्यातील उर्वरित पात्र शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत प्रलंबित असलेली फार्मर आयडी नोंदणी येत्या १५ नोव्हेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. यासंदर्भात कृषी विभागाच्या अॅग्रीस्टॅक योजनेच्या कार्यालयाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

प्रलंबित नोंदणीसाठी विशेष मोहीम

शासनाच्या पत्रानुसार, राज्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले असले, तरी काही पात्र शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यासाठी महसूल, कृषी आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या प्रलंबित नोंदणी याद्यांनुसार प्रत्येक शेतकऱ्याची नोंदणी पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत.

पीएम-किसान लाभार्थ्यांच्या नोंदणीलाही प्राधान्य

पीएम-किसान योजनेंतर्गत सक्रिय लाभार्थी, वनपट्टाधारक शेतकरी तसेच इतर पात्र शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. नोंदणीअभावी पात्र शेतकरी शासनाच्या विविध योजना, अनुदान आणि आर्थिक मदतीपासून वंचित राहू नयेत, हा या मोहिमेमागील प्रमुख उद्देश आहे.

१५ नोव्हेंबरपूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्राधान्याने कार्यवाही करावी. तसेच नोंदणीच्या प्रगतीचा नियमित आढावा घेऊन उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांनी काय करावे?

ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी अद्याप तयार झालेला नाही, त्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, तलाठी किंवा संबंधित नोंदणी केंद्राशी संपर्क साधून नोंदणीची स्थिती तपासावी. आवश्यक कागदपत्रांची माहिती घेऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.