दुर्गा उत्सवात कोरची पोलिसांकडून महिलांना सायबर गुन्ह्यांविषयी मार्गदर्शन
स्वयंपाक करणाऱ्या महिलांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती; पोलिसांच्या उपक्रमाचे कौतुक
कोरची, प्रतिनिधी : सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, विविध प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीतून सामान्य नागरिकांची आर्थिक लुबाडणूक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरची पोलीस स्टेशनच्या वतीने दुर्गा उत्सवादरम्यान स्वयंपाक करणाऱ्या महिलांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमात कोरची पोलीस स्टेशनचे PSI ज्ञानेश्वर कदम, WPSI सोनाली बल्हाळ, WPC निलांगी भलवे आणि WPC आर्या अलबनकर यांनी सहभाग घेतला. त्यांनी महिलांना सायबर गुन्हे कोणत्या पद्धतीने घडतात, ऑनलाइन फसवणूक करणारे आरोपी नागरिकांना कशाप्रकारे जाळ्यात ओढतात आणि अशा घटनांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत माहिती दिली.
अन ओळखीच्या व्यक्तींचे फोन, संशयास्पद लिंक, बनावट संदेश, ओटीपीची मागणी तसेच ऑनलाइन व्यवहारांदरम्यान होणारी फसवणूक याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खात्याची माहिती, पासवर्ड किंवा ओटीपी देऊ नये, तसेच संशयास्पद संदेशांवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नयेत, असेही त्यांनी सांगितले.
सामान्य नागरिकांपर्यंत थेट पोहोचून पोलिसांकडून सायबर गुन्ह्यांविषयी जागृती केली जात असल्याचे पाहून उपस्थित महिलांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांना आळा बसावा, यासाठी अशा जनजागृती मोहिमा महत्त्वपूर्ण ठरत आहेत.





