ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा; पोलिसांचे आवाहन*

सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्या, नियमांचे पालन करा; गणेश मंडळांना पोलिसांचे मार्गदर्शन

सिरोंचा : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिरोंचा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून पार पाडण्यासाठी गणेश मंडळे, नागरिक व प्रशासनाने परस्पर सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे., उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा समाधान पाटील, पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ, नायब तहसीलदार पारधी तसेच महावितरण विभागाचे अभियंता कांकाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ यांनी सांगितले की, १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे. केवळ मनोरंजनात्मक कार्यक्रम न घेता गरीब व गरजू नागरिकांना मदत करणारे सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांनी गणेशोत्सव काळात शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. डीजेचा वापर टाळून शासनाच्या नियमांचे पालन करावे, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले. पोलिसांकडून गणेश मंडळांना दररोज भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गणेश विसर्जनाच्या वेळी वाहनांचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी. कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच शाळेत जाणारे विद्यार्थी आणि नागरिकांना वाहतुकीमुळे त्रास होणार नाही, याची मंडळांनी काळजी घ्यावी, असे आवाहन समाधान पाटील यांनी केले. लोकप्रतिनिधी, गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

अप्पर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. यांनी गणेशोत्सव तसेच आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसर नशामुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. सामाजिक उपक्रम राबवून आदर्श गणेश मंडळ म्हणून काम करण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक गणेश मंडळासाठी एक पोलीस अंमलदार नियुक्त करून मंडळाशी समन्वय ठेवण्यात येणार असून, आवश्यक ते सहकार्य पोलिसांकडून केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. “आम्ही आपल्या सेवेसाठी आहोत; पोलिसांना सहकार्य करा,” असे आवाहनही त्यांनी केले.

बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस उपनिरीक्षक, महिला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

या शांतता समिती बैठकीला सिरोंचा तालुक्यातील पोलीस पाटील, नगरसेवक, युवक, गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

G K