गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

सीईओंची बामणीसह ग्लासफोडपेठ आरोग्य केंद्राला भेट आरोग्य सेवांचा घेतला सखोल आढावा; मलेरिया-डेंग्यू प्रतिबंधासाठी उपाययोजना अधिक प्रभावी करण्याच्या सूचना

सीईओंची बामणीसह ग्लासफोडपेठ आरोग्य केंद्राला भेट आरोग्य सेवांचा घेतला सखोल आढावा; मलेरिया-डेंग्यू प्रतिबंधासाठी उपाययोजना अधिक प्रभावी करण्याच्या सूचना

सिरोंचा,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन मडावी यांच्यासह सिरोंचा तालुक्यातील बामणी प्राथमिक आरोग्य पथक, ग्लासफोडपेठ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सिरकोंडा आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होत आहेत का, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
भेटीदरम्यान आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग, प्रसूती कक्ष, औषधसाठा, प्रयोगशाळा, स्वच्छता व्यवस्था, कर्मचारी उपस्थिती, रुग्ण नोंदवही तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यात आली. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आरोग्य समस्यांचा विचार करून आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
ग्लासफोडपेठ येथील नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीची पाहणी करून बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली. इमारतीत आवश्यक सुविधा उपलब्ध करून नागरिकांना अधिक चांगली आरोग्य सेवा देण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी असलेल्या अडचणी, पाणी साचण्याची समस्या आणि इमारतीच्या दुरुस्तीची आवश्यकता याबाबतही चर्चा करून त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
यानंतर जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्राला भेट देऊन बालकांच्या पोषण स्थितीचा आढावा घेण्यात आला. प्रसूतीनंतर मातांच्या घरी भेट देऊन माता व नवजात बालकांना शासनाच्या आरोग्य सेवा वेळेवर मिळत आहेत का, याची खातरजमा करण्यात आली. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधावर विशेष भर
पावसाळ्यात मलेरिया व डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. कंटेनर सर्वेक्षण, ताप सर्वेक्षण, डास नियंत्रण, औषधसाठा, निदान सुविधा, जनजागृती मोहीम तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे परीक्षण करण्यात आले. गावपातळीवर स्वच्छता राखणे, पाणी साचू न देणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बामणी प्राथमिक आरोग्य पथकाचे श्रेणीवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत व प्रभावी आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी यावेळी दिले.