
मुलचेरा:
जुलै महिना अर्ध्यावर येऊन ठेपला असतानाही मुलचेरा तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. अधूनमधून हलक्या सरी कोसळत असल्या तरी खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला सलग आणि दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.
शेतकऱ्यांनी शेतांची मशागत, नांगरणी व इतर पूर्वतयारी पूर्ण केली आहे. अनेकांनी बियाणे आणि खतेही खरेदी करून ठेवली आहेत. मात्र पुरेशा ओलाव्याअभावी पेरणी करावी की आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी, या संभ्रमात शेतकरी आहेत.
वेळेत पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून,धान व इतर पिकांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. सध्या मुलचेरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले असून दमदार पावसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
हवामानात ढगांची वर्दळ असली तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. आता येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाल्यासच खरीप हंगामाला गती मिळेल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





