
‘निक्षय मित्र’ उपक्रमांतर्गत ७२ लाख रुपयांच्या सहकार्याने उत्तर गडचिरोलीतील क्षयरुग्णांना लाभ; उमेद महिला बचत गटांनाही रोजगाराची संधी
गडचिरोली, दि. १४ जुलै २०२६ : गडचिरोली जिल्ह्यातील क्षयरुग्णांना पोषण सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि कॅनरा बँकेच्या विभागीय मुख्य शाखेचे सहायक प्रबंधक मृत्युंजय कुमार झा यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासन आणि कॅनरा बँक यांच्यामध्ये सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. या उपक्रमांतर्गत कॅनरा बँक ‘निक्षय मित्र’ म्हणून नोंदणीकृत झाली असून, क्षयरुग्णांच्या पोषण सहाय्यासाठी बँकेकडून ७२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यापूर्वी जिल्हा खनिज प्रतिष्ठान (डीएमएफ) निधीअंतर्गत समाविष्ट खाण प्रभावित क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर क्षयरुग्णांना पोषण सहाय्य पुरविण्यात येत होते. या उपक्रमाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आता कॅनरा बँकेच्या सहकार्याने जिल्ह्याच्या उत्तर भागातील डीएमएफच्या कक्षेबाहेरील क्षेत्रांतील क्षयरुग्णांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत उपचार प्रक्रियेला पूरक ठरणारे पोषणयुक्त अन्नकिट नियमितपणे वितरित करण्यात येणार असून, औषधोपचारासोबत आवश्यक पोषण उपलब्ध झाल्यामुळे उपचारांचा सकारात्मक परिणाम वाढण्यास तसेच रुग्णांना लवकर बरे होण्यास मदत होणार आहे.
पोषण किटचे वितरण उमेद अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या महिला बचत गटांमार्फत संबंधित उपकेंद्रांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पोषण किटच्या खरेदी, पॅकिंग आणि वितरण प्रक्रियेत महिला बचत गटांचा सहभाग राहणार असून, यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला बळकटी मिळण्याबरोबरच महिला बचत गटांसाठी उत्पन्नाच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत.
केंद्र शासनाच्या ‘टीबीमुक्त भारत’ अभियानाला बळ देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे सार्वजनिक-खासगी भागीदारीचे प्रभावी उदाहरण निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, कॅनरा बँक आणि उमेद महिला बचत गट यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या दिशेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असून, उपचारासोबत आवश्यक पोषण सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम विशेष परिणामकारक ठरणार आहे.





