ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

केंद्रीय कौशल्य विकास परिषदेत राज्यातून गडचिरोलीच्या कौशल्य विकास मॉडेलचे सादरीकरण

केंद्रीय कौशल्य विकास परिषदेत राज्यातून गडचिरोलीच्या कौशल्य विकास मॉडेलचे सादरीकरण

केंद्रीय कौशल्य विकास सचिव व सर्व राज्यांच्या कौशल्य विकास सचिवांसमोर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मांडला जिल्हा कौशल्य विकास आराखडा

गडचिरोली, दि. १४ (जिमाका) : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे वतीने आयोजित परिषदेत गडचिरोली जिल्ह्याच्या उद्योगाभिमुख कौशल्य विकास मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत महाराष्ट्रातून एकमेव गडचिरोली जिल्ह्याची सादरीकरणासाठी निवड करण्यात आली होती. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केंद्रीय कौशल्य विकास सचिव देबश्री मुखर्जी तसेच सर्व राज्यांच्या कौशल्य विकास सचिवांसमोर जिल्हा कौशल्य विकास आराखड्याचे सविस्तर सादरीकरण केले.

या बैठकीत राज्यांच्या सादरीकरणासाठी आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश, तर जिल्हास्तरावर आसाममधील कचार, गुजरातमधील राजकोट आणि महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. सादरीकरणादरम्यान गडचिरोलीच्या उद्योग समन्वय मॉडेलची विशेष दखल घेण्यात आली.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणात स्थानिक उद्योगांच्या गरजांनुसार कौशल्य प्रशिक्षण, उद्योग-प्रशासन-प्रशिक्षण संस्थांमधील समन्वय, टाटा टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने गोंडवाना विद्यापीठात कार्यरत नवोपक्रम, उद्योजकता व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (सीआयआयआयटी) तसेच जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) या केंद्राशी जोडून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याची व्यवस्था याविषयी माहिती दिली.

याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा व लॉइड्स मेटल्स यांच्या सहकार्याने राबविण्यात येणारे रोजगाराभिमुख प्रशिक्षण, जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून उभारण्यात आलेले कौशल्य विकास केंद्र, गौण वनोपज संकलक प्रशिक्षण, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सौर तंत्रज्ञ प्रशिक्षण, ‘नाव्या’ योजनेअंतर्गत महिलांसाठी विविध कौशल्य प्रशिक्षण तसेच बांबू व काष्ठ प्रक्रियेसारख्या स्थानिक संसाधनांवर आधारित रोजगारनिर्मिती या उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.

स्थानिक उद्योगांना आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ जिल्ह्यातच तयार करून युवकांना स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासन विविध कौशल्य विकास उपक्रम प्रभावीपणे राबवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.