ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

एमपीएससी परीक्षा ऑफलाइनच घ्या; स्पर्धा परीक्षांतील बदलांविरोधात लातूरमध्ये विद्यार्थ्यांचा भव्य लक्षवेधी महामोर्चा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत लातूर जिल्हा विद्यार्थी समन्वय समितीच्या वतीने शुक्रवारी लातूर शहरात भव्य लक्षवेधी महामोर्चा काढण्यात आला. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि भरती प्रक्रियेत विश्वासार्हता कायम ठेवण्याच्या मागण्यांसाठी हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून सुरू झालेला महामोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चात सहभागी विद्यार्थ्यांनी शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “एमपीएससी परीक्षा ऑफलाइनच घ्या”, “आमच्या घामाची आणि मेहनतीची किंमत द्या”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा”, “भरती प्रक्रिया पारदर्शक करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

मोर्चात मोठ्या संख्येने एमपीएससी, टीईटी, पोलीस भरती तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक असून शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

यानंतर कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात स्पर्धा परीक्षांच्या विद्यमान प्रणालीतील त्रुटी अधोरेखित करून त्या दूर करण्याची मागणी करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी एमपीएससी आणि टीईटीसारख्या महत्त्वाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची प्रमुख मागणी केली. तसेच पोलिस भरतीचे वेळापत्रक तातडीने जाहीर करावे, टीईटी परीक्षेची तारीख घोषित करावी, लघुलेखक पदे पुन्हा सुरू करून भरती प्रक्रिया राबवावी, ‘गट ड’ पदभरतीचे केंद्रीकरण रद्द करून नियमित भरती सुरू करावी, अशा विविध मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या.

पेपरफुटीसारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असल्याने अशा गुन्ह्यांतील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद असलेला विशेष कायदा लागू करण्यात यावा, तसेच भरती प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी स्वतंत्र आणि त्रयस्थ यंत्रणा स्थापन करावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली.

विद्यार्थ्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, ऑनलाइन परीक्षा पद्धतीमुळे विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. परीक्षा केंद्रांवरील तांत्रिक बिघाड, इंटरनेट समस्या, संगणकीय त्रुटी आणि व्यवस्थापनातील उणिवांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून त्यांच्या गुणवत्तेवर अन्याय होत आहे. त्यामुळे परीक्षा पद्धती अधिक विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक करण्यासाठी ऑफलाइन परीक्षाच योग्य असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.

आंदोलनकर्त्यांनी शासनाला इशारा देताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास हे आंदोलन राज्यभर तीव्र करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असल्याने शासनाने तातडीने चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

या लक्षवेधी महामोर्चामुळे लातूर शहरात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा राज्याचे लक्ष वेधले गेले असून, शासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.