गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त पणजी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह महाविद्यालयाचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाऊसाहेबांचा दूरदृष्टीचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी राज्यात गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय दूरदृष्टीने घेतला होता. या संस्थेमुळे हजारो विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाची संधी मिळाली आणि त्यापैकी अनेकांनी विविध क्षेत्रांत महत्त्वाची पदे मिळवली, असे सावंत यांनी सांगितले.
भविष्यातील गरजा ओळखून शैक्षणिक संस्था उभारण्याची तीच भूमिका सरकारने स्वीकारली आहे. गोव्यात आयआयटीसारख्या संस्था आणण्यामागेही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयआयटीला होणाऱ्या विरोधामागे काहींचे जमिनीशी संबंधित हितसंबंध असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. अशा विरोधामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी गमवाव्या लागू नयेत, असेही ते म्हणाले.
पुढील 25 वर्षांचा विचार करण्याचे आवाहन
गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने आगामी 25 वर्षांतील शैक्षणिक गरजा आणि पायाभूत सुविधांचा विचार करून नियोजन करावे, असे आवाहन सावंत यांनी केले. भविष्यात आवश्यक असणाऱ्या सुविधा आणि विकासकामांबाबतचे प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अशा प्रस्तावांना पुढील एका वर्षात अधिकाधिक मंजुरी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्यकाळात अनेक बदल करण्यात आल्याचे सांगत, पणजीतील पाच महाविद्यालये एकाच ठिकाणी आणण्याची सरकारची योजना असल्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी अनुयायी नव्हे, नेतृत्व करणारे बनावे : डॉ. काकोडकर
कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी देशाच्या विकासातील शिक्षण संस्थांचे महत्त्व अधोरेखित केले. संपत्ती निर्माण करण्याची क्षमता असलेले, समाजाच्या आनंद आणि कल्याणात योगदान देणारे विद्यार्थी घडवणे ही शिक्षण संस्थांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ इतरांचे अनुकरण करणारे न राहता स्वतः नेतृत्व करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. त्यांच्यातील भीती दूर करून आत्मविश्वास वाढवणे आवश्यक आहे. शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी तयार करतानाच त्यांच्यातील माणुसकी आणि सामाजिक संवेदनशीलताही जपली पाहिजे, असे मत काकोडकर यांनी व्यक्त केले.





