गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

सिरोंचा (कोत्तागुळम) येथे SIR विशेष कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 500 हून अधिक नागरिकांचा सहभाग

 

सिरोंचा | प्रतिनिधी

 

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत दि. 15 जुलै 2026 रोजी केंद्र क्रमांक 258, 259 व 260 अंतर्गत सिरोंचा (कोत्तागुळम) ग्रामपंचायत चौकातील पटांगणात विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले.

 

या कॅम्पमध्ये BLO एम. डी. इमरान, एस. आर. मारगोनी आणि मनोज मंथेना यांनी नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच सर्व पात्र नागरिकांचे अर्ज सुलभ व वेळेत भरता यावेत, या उद्देशाने उत्कृष्ट नियोजन केले. कॅम्पस्थळी नागरिकांच्या सोयीसाठी टेंट उभारण्यात आला तसेच बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच दूरवरून आलेल्या नागरिकांना उन्हाचा त्रास न होता आरामात अर्ज भरता आले.

 

कॅम्पमध्ये मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नावातील दुरुस्ती, स्थलांतर तसेच इतर आवश्यक अर्ज भरण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. त्यामुळे अनेक नागरिकांची कामे एकाच ठिकाणी जलद व सुलभ पद्धतीने पूर्ण झाली.

 

विशेष म्हणजे, नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आले. कॅम्पस्थळी विद्युत दिव्यांची (लाईटची) व्यवस्था करून रात्रीच्या वेळेतही फॉर्म भरण्याचे काम अखंडपणे सुरू ठेवण्यात आले. दिवसभर कामानिमित्त व्यस्त असलेल्या अनेक नागरिकांनी रात्री कॅम्पमध्ये येऊन आपल्या अर्जांची प्रक्रिया पूर्ण केली.

 

या विशेष कॅम्पला 500 हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. टेंट, बसण्याची व्यवस्था, रात्रीची लाईट व्यवस्था आणि सुरळीत नियोजनामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. “नागरिकांच्या सोयीचा विचार करून करण्यात आलेली ही व्यवस्था अत्यंत कौतुकास्पद असून, त्यामुळे फॉर्म भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी व सुलभ झाली,” अशा भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिवसभर कामावर असलेल्या नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.

सिरोंचा (कोत्तागुळम) येथे आयोजित करण्यात आलेला हा SIR विशेष कॅम्प नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे यशस्वी ठरला. नागरिकाभिमुख सुविधा, शिस्तबद्ध नियोजन आणि दिवसभरासह रात्रीपर्यंत सुरू ठेवलेले कामकाज यामुळे या कॅम्पची परिसरात सर्वत्र प्रशंसा होत असून, मतदार नोंदणी प्रक्रियेला मोठी गती मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.