ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

Ganesh Chaturthi 2026 : यंदा गणराया 12 दिवसांसाठी मुक्कामी, नऊ वर्षांनी योग; हरितालिका-गणेश चतुर्थी एकाच दिवशी, उपवास कधी सोडायचा?

नाशिक : यंदाचा गणेशोत्सव धार्मिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर यंदा गणरायाचा मुक्काम १२ दिवसांचा राहणार असून, त्याचबरोबर हरितालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत (Ganesh Sthapana Muhurat 2026) आहेत. तिथीच्या विशिष्ट गणितामुळे दोन्ही व्रतांचा योग एकाच दिवशी आला आहे. त्यामुळे हरितालिका पूजन कधी करायचे, गणेशाची स्थापना कोणत्या वेळी करायची आणि उपवास कधी सोडायचा, याबाबत भाविकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

पंचांगानुसार १४ सप्टेंबरला सूर्योदयाच्या वेळी तृतीया तिथी असून सकाळी ७.०७ वाजता तृतीया समाप्त होते. हरितालिका तृतीया व्रतासाठी सूर्योदय व्यापिनी तृतीया आवश्यक मानली जाते. दुसरीकडे गणेश चतुर्थीच्या व्रतासाठी चतुर्थी तिथीचा मध्यान्ह काळाशी संबंध महत्त्वाचा असतो. यंदा सूर्योदयाच्या वेळी तृतीया आणि मध्यान्ह काळात चतुर्थी असल्यामुळे दोन्ही व्रते एकाच दिवशी आली आहेत. त्यामुळे हरितालिका आणि गणेश चतुर्थी यांच्यातील हा योग तिथीच्या नियमांनुसार घडला आहे.

बारा दिवसांच्या गणरायाच्या मुक्कामाचा योग तब्बल नऊ वर्षांनंतर आला आहे, याआधी २००६ आणि २००९ मध्ये हरितालिका व गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा हा योग आला आहे. तसेच यापूर्वी २०१७ मध्ये १२ दिवसांचा गणेशोत्सव झाला होता. यंदाही तिथीच्या अधिक दिवसांच्या गणितामुळे गणरायाचा मुक्काम १२ दिवसांचा होणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवातील हा दुर्मीळ तिथीयोग, १२ दिवसांचा मुक्काम आणि त्यात येणारे गौरीपूजन यामुळे भाविकांसाठी धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचे पर्व ठरणार आहे.