
गडचिरोली, दि. २१ : डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत संरक्षित साठ्यासह ९०६ मेट्रिक टन डीएपी खताचा पुरवठा करण्यात आला असून, पुढील काही दिवसांत आणखी १२०० मेट्रिक टन डीएपी खताचा साठा उपलब्ध होणार असल्याची माहितीही श्रीमती खोमणे यांनी दिली आहे.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी केवळ डीएपीवर अवलंबून न राहता कृषी विभागाने शिफारस केलेल्या पर्यायी खतांचा वापर करून संतुलित खत व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. डीएपीमध्ये १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के स्फुरद असते. त्याऐवजी एनपीके १०:२६:२६, एनपीके २०:२०:०:१३, एनपीके १२:३२:१६, एनपीके १५:१५:१५ तसेच युरिया-एसएसपी कॉम्प्लेक्स यांसारख्या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांना नत्र, स्फुरद आणि पालाश ही तीनही प्रमुख अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात उपलब्ध होतात.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, ट्रिपल सुपर फॉस्फेट (TSP) हेही डीएपीला प्रभावी पर्याय ठरू शकते. डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि एक गोणी टीएसपी वापरल्यास स्फुरदाची गरज प्रभावीपणे पूर्ण होऊ शकते. तसेच सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) हे देशांतर्गत उत्पादित खत असून त्यामध्ये १६ टक्के स्फुरदासह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. विशेषतः सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल यांसारख्या तेलबिया पिकांसाठी एसएसपीचा वापर अधिक लाभदायक असल्याचे कृषी तज्ज्ञांनी नमूद केले आहे. डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि तीन गोण्या एसएसपीचा वापर हाही एक चांगला पर्याय ठरू शकतो.
कृषी विभागाने खतांच्या किमतींबाबतही शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनुदानित युरियाची किंमत प्रति गोणी २६६.५० रुपये तर डीएपीची किंमत १,३५० रुपये आहे. विविध कंपन्यांच्या संयुक्त खतांच्या किमती वेगवेगळ्या असून, लोकप्रिय २०:२०:०:१३ आणि १०:२६:२६ खतांच्या किमतीत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. ग्रॅन्युलर सिंगल सुपर फॉस्फेटची किंमत सुमारे ६५० रुपये, तर झिंक बोरोन एसएसपीची किंमत सुमारे ८६० रुपये आहे.
*खत खरेदी करताना दक्षता घ्या*
कृषी विभागाने शेतकऱ्यांना खत खरेदी करताना प्रत्येक गोणीवरील मुद्रित कमाल किरकोळ किंमत (MRP) तपासूनच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. पॉस मशीनवर नवीन दर दिसत असले तरी प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.





