गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

सिरोंचा:-“ज्या शाळेने आपल्याला घडवले, त्या शाळेचे ऋण समाजाप्रती सेवा करून फेडूया,” या उदात्त भावनेतून राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, सिरोंचा येथील सन २०००–२००१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविला.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या तसेच शिक्षणासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. तसेच शाळेतील शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “याच शाळेने आम्हाला शिक्षण, संस्कार आणि जीवनाची योग्य दिशा दिली. त्या ऋणाची परतफेड करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.”

या कार्यक्रमाला नगरसेवक इम्तियाज खान, नागेश पेदापल्ली, मनोज कलकोटवार, शंकर नडीगोटा, सिनू मंडावर, मानतेश बुद्धवार, दिनेश तसेच सन २०००–२००१ बॅचचे इतर माजी विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमास मुख्याध्यापक गणेश तगरे, शाळा प्रशासन, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांची उपस्थिती लाभली. उपस्थितांनी माजी विद्यार्थ्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान हीच या उपक्रमाची खरी पावती ठरली.