लोहार समाजाच्या सामाजिक समस्यांवर आरमोरीत सखोल विचारमंथन
वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघाच्या त्रैमासिक सहविचार सभेला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आरमोरी…. वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ, नागपूर शाखा गडचिरोली यांच्या वतीने समाजाच्या विविध सामाजिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी आरमोरी येथे त्रैमासिक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रश्नांसह विविध विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.
आरमोरी येथील स्वरूप महल सेलिब्रेशन हॉल येथे पार पडलेल्या या सभेला समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटनात्मक एकजूट मजबूत करणे, शिक्षणाचा प्रसार करणे आणि आर्थिक प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्न करणे, यावर यावेळी भर देण्यात आला.
समाजातील तरुणांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, सामाजिक एकोपा वाढविणे, तसेच समाजासमोरील विविध अडचणींवर एकत्रितपणे मार्ग काढणे, यासंदर्भात उपस्थितांनी आपली मते मांडली. समाजाच्या प्रगतीसाठी संघटित प्रयत्न आणि प्रभावी मार्गदर्शन आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन दिलीप सोनटक्के यांनी केले, तर आभारप्रदर्शन संदीप चंदनखेडे यांनी केला. समाजाच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा घडवून आणणारी ही सभा समाजबांधवांसाठी मार्गदर्शक ठरली.






