येळ्ळूर परिसरातील महिला विजयादशमीच्या दिवशी देवीची आरती करून रात्रभर जागर करतात. या पारंपरिक धार्मिक सोहळ्याला सांस्कृतिक कार्यक्रमाची जोड देण्याच्या उद्देशाने विश्वस्त मंडळाने संगीत सोंगी भजनाचे आयोजन केले होते. मंडळाच्या कलाकारांनी सादर केलेल्या भजनाने उपस्थितांची मने जिंकली.
पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री चांगळेश्वरी देवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायण कल्लाप्पा कंग्राळकर यांनी भूषविले. कर्नाटक सरकारचे निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी विलास नारायण घाडी, पंचरत्न रिअल इस्टेटचे अमित यल्लाप्पा पाटील आणि वरद इंडस्ट्रीज, उद्यमबागचे रोहन राजाराम हांगीरगेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, उद्योजक नारायण दत्तात्रय पाटील (एन. डी. पाटील), माजी उपाध्यक्ष प्रमोद पुंडलिक पाटील, माजी सदस्य शिवाजी जोतिबा नांदुरकर आणि सैनिक को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन परशुराम धाकोजी घाडी यांच्या हस्ते देवीपूजन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन आणि शिवपूजनाचे धार्मिक विधीही पार पडले.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. दसरा सी. एम. कप कुस्ती स्पर्धेच्या 125 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविल्याबद्दल पैलवान विनायक प्रल्हाद पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच माजी सैनिक रमेश लक्ष्मण उडकेकर आणि संतोष पांडुरंग देवलतकर यांचाही सन्मान करण्यात आला.
उदय भरमाण्णा हुंदरे यांची कुद्रेमनी ग्रामपंचायतीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. भजनी मंडळातील कलाकार आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रमाला येळ्ळूर आणि परिसरातील नागरिक, महिला, भाविक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक परंपरा, संगीत सोंगी भजनाची सांस्कृतिक मेजवानी आणि गुणवंतांचा सन्मान यांमुळे विजयादशमीच्या उत्सवाला विशेष रंगत आली. धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी विश्वस्त मंडळाने केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.




