
अनाथ प्रमाणपत्र धारकांसाठी महसूल विभागाचे विशेष अभियान; २२ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान राज्यभर शिबिर
मुंबई, दि. २१ जुलै :
महसूल विभागाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” अंतर्गत राज्यातील अनाथ प्रमाणपत्र धारकांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये २८८ विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या शिबिरांद्वारे अनाथ प्रमाणपत्र धारकांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
अनाथ प्रमाणपत्र धारकांना मोफत शिक्षण, सरकारी सेवेत १ टक्का आरक्षण, वसतिगृहातील सवलती, तर्पण फाउंडेशनमार्फत विविध सहाय्य, तसेच बालगृहात राहण्याच्या कालावधीबाबतच्या सुविधा यांसारख्या योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
याशिवाय, तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ युवक-युवतींसाठी शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, निवास आणि विविध कल्याणकारी उपक्रमही राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून ही मोहीम राबविण्यात येत असून, पात्र अनाथ प्रमाणपत्र धारकांनी आपल्या परिसरातील विशेष शिबिरात सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





