अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभरात एफडीएकडून (FDA) मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. गुटखा, भेसळयुक्त पदार्थ, औषधे आणि हॉटेलमधील नियमभंगाच्या प्रकरणांवर आणि अस्वच्छतेवर एफडीएने कारवाईचा वेग वाढवला आहे. मात्र, याच कारवाईच्या पद्धतीवर आता मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलवर एफडीएकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर संबंधित हॉटेल व्यवस्थापनाने न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने एफडीएच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आणि समान निकषांवर कारवाई करण्याचे निर्देश एफडीएला दिले. मुंबईतील मंत्रालयातील कँटीनच्या तपासणीचा मुद्दाही या सुनावणीत चर्चेत आला. एफडीएने मंत्रालयातील उपहारगृहाची तपासणी करून ते जवळपास स्वच्छ असल्याचा अहवाल दिला होता. मात्र, न्यायालयाने या अहवालावर प्रश्न उपस्थित करत फेरतपासणीचे आदेश दिले. न्यायालयाच्या निर्देशानुसार वकिलांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या तपासणीत मंत्रालयाच्या कँटीनमध्ये अनेक त्रुटी आढळल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार, कँटीनमध्ये माशा आढळल्या, ड्रेनेजच्या जाळ्या उघड्या होत्या, फ्रीजमध्ये अस्वच्छता होती आणि बेसिन परिसरातही स्वच्छतेचा अभाव दिसून आला. यानंतर न्यायालयाने एफडीएच्या आधीच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.





