ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुक्त विद्यापीठाचा मोठा निर्णय! बी.कॉम अन् एमसीए आता घरी बसून ऑनलाइन शिकता येणार; प्रवेश क्षमतेची मर्यादा नाही

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेनुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आता ‘बी.कॉम’ आणि ‘एमसीए’ हे पदवी अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश क्षमतेची कोणतीही मर्यादा नसून कितीही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली. ऑनलाइन प्रॉक्टर पद्धतीने परीक्षा होणार असून १०० विद्यार्थ्यांमागे एक मेंटॉर मार्गदर्शन करणार आहे.

 : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला बी. कॉम व एमसीए हे पदवी अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यास नुकतीच मान्यता दिली आहे. या अभ्यासक्रमांच्या जागांसाठी कोणतीही मर्यादा नसल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.मुक्त विद्यापीठामार्फत दूरस्थ पद्धतीने विविध प्रमाणपत्र, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जात आहेत. विद्यापीठाच्या राज्यभरातील अभ्यासकेंद्रांमार्फत हे अभ्यासक्रम राबविले जातात. परंतु, यंदापासून विद्यापीठामार्फत ऑनलाइन पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली. नुकतीच ‘यूजीसी’च्या डिस्टन्स एज्युकेशन बोर्डमार्फत (डीईबी) विद्यापीठाला ऑनलाइन पद्धतीने बी. कॉम आणि एमसीए हे अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. विशेष म्हणजे यासाठी प्रवेश क्षमतेची मर्यादा नसून, कितीही विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. यापूर्वी, विद्यापीठाला बीसीए व एमबीए या ऑनलाइन अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली असून, बीसीएसाठी प्रवेश क्षमतेची अट नसून एमबीएला मात्र एक हजार विद्यार्थी प्रवेश क्षमता असणार आहे.

दोन वर्षे तयारी

या ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठामार्फत दोन वर्षे तयारी सुरू होती. अभ्यासक्रमाच्या क्रेडिटनुसार त्याचे व्हिडीओ तयार करण्यात आले असून, एका क्रेडिटसाठी १५० व्हिडीओ असणार आहेत. प्रत्येक व्हिडीओ ७ ते १० मिनिटांचा असून, ते विद्यार्थ्याला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. एक व्हिडीओ अभ्यासल्यानंतर त्यावर प्रश्नावली येणार आहे. ती प्रश्नावली भरून, त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील व्हिडीओ विद्यार्थ्याला अभ्यासता येणार आहे. तसेच १०० विद्यार्थ्यांमागे १ मेंटॉर असणार आहे. व्हॉट्सॲप ग्रुप व ई-मेद्वारे या मेंटॉरमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. ऑनलाइन प्रॉक्टर बेस्ड्‌ पद्धतीने या अभ्यासक्रमांची परीक्षा घेतली जाणार आहे.