ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*एसटी बस अपघातानंतर प्रशासन गंभीर; गडचिरोली जिल्ह्यासाठी २० अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेस मंजूर!*

 

प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर ५ बसेस ताफ्यात दाखल

गडचिरोली:

गडचिरोली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्दैवी एसटी बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने आणि राज्य शासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील एसटी वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि बळकट करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट निर्देशानुसार, गडचिरोली जिल्ह्यासाठी २० अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, मंजूर करण्यात आलेल्या २० बसेसपैकी ५ अत्याधुनिक बसेस आधीच गडचिरोली एसटी आगाराच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, उर्वरित बसेसही लवकरच सेवेत रुजू होणार आहेत.
अत्याधुनिक ५४ आसनी बसेसमुळे प्रवास होणार सुकर:
या नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस ५४ आसनी (Seater) क्षमतेच्या असून, त्या पूर्णपणे अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज आहेत. दुर्गम आणि ग्रामीण भागातील रस्त्यांचा विचार करून प्रवाशांचा प्रवास अधिक सुखाचा आणि सुरक्षित व्हावा, या दृष्टीने या बसेसची रचना करण्यात आली आहे.
जिल्ह्यात झालेल्या अपघातानंतर जुन्या आणि नादुरुस्त बसेस बदलण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. मुख्यमंत्र्यांच्या या तत्पर निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील प्रवाशांना, विद्यार्थ्यांना आणि नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला असून, एसटीची वाहतूक सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

G K