Uncategorized

वायरी मारुती मंदिर परिसरात नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण; आमदार निलेश राणे यांच्या निधीतून काम पूर्ण; दत्ता सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

मालवण | प्रतिनिधी : वायरी येथील मारुती मंदिर परिसरातील कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निधीतून हे काम पूर्ण करण्यात आले.

ट्रान्सफॉर्मरमुळे परिसरातील वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या कामासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला होता. उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव आणि नगरसेविका नीना मुंबरकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. काम पूर्ण झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत संबंधितांचे आभार मानले.

यापूर्वी सातेरी देवी मंदिर मार्गावरही विद्युत ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आला आहे. शहरातील वीजविषयक समस्या सोडवण्यासाठी विकासकामांना प्राधान्य दिले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यावर भर

कार्यक्रमाला नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेविका भाग्यश्री मयेकर आणि अश्विनी कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक कटिबद्ध असल्याचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी सांगितले. विकासकामांसाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नीतेश राणे यांचे आभार मानले.