ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकऱ्यांना मदत दिवाळीपूर्वीच, दुष्काळाचा ‘जीआर’ आज काढणार; शेतातच मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळाची तीव्रता वाढलेल्या पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून तातडीच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. आज, शुक्रवारी दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील शासन आदेश काढला जाईल. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

वाशीम जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली. यानंतर ते अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून मुंबईला रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, वाशीममधील पाहणीदरम्यान पिकांची विदारक स्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समोर लक्षात आल्या. दुष्काळाची निश्चिती करण्यासाठी असलेल्या संहितेनुसार ‘ट्रिगर-१’च्या आधारे पहिला शासन आदेश काढण्यात येणार आहे. त्यातून एखादा भाग वगळला गेला, तर पुढील टप्प्यात ‘ट्रिगर-३’च्या माध्यमातून त्या भागाचाही समावेश करण्याची कार्यवाही केली जाईल.