* ‘प्रोजेक्ट H₂OPE’ ला मिळाली गती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला सामंजस्य करार
* १३४ शासकीय शाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा; २६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ
गडचिरोली:
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील प्रत्येक शासकीय शाळेत मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे, अशी ग्वाही गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या विशेष सामंजस्य करारामुळे (MoU) जिल्ह्यातील ‘प्रोजेक्ट H₂OPE’ (प्रोजेक्ट होप) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला मोठी गती मिळाली आहे.
२६ हजार विद्यार्थी व नागरिकांना मिळणार शुद्ध पाणी:
या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १३४ शासकीय शाळांमध्ये अत्याधुनिक आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा यशस्वीरित्या सुरू करण्यात आली आहे. याचा थेट फायदा २६ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांना होत आहे.
३८४ शाळांपर्यंत विस्तार, ₹८.३६ कोटींची गुंतवणूक:
‘प्रोजेक्ट H₂OPE’ चा विस्तार गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ३८४ शासकीय शाळांपर्यंत करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी आतापर्यंत या प्रकल्पात ₹८.३६ कोटींची मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे.
‘विद्यांजली’ पोर्टलच्या माध्यमातून सहकार्याचे आवाहन:
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील इतर शाळांचा कायापालट करण्यासाठी सामाजिक संस्था (NGOs) आणि सी.एस.आर. (CSR) कंपन्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. शासकीय शाळांच्या गरजेनुसार विविध सोयी-सुविधा पुरवण्यासाठी संस्थांनी केंद्र सरकारच्या ‘विद्यांजली’ पोर्टलच्या माध्यमातून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.





