इतर

सावंतवाडी मतदारसंघात योगा सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार : विशाल परब; फिट इंडिया अभियानातून योगाचा प्रसार

सावंतवाडी, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ मंत्रातून प्रेरणा घेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात योगाचा प्रसार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. मतदारसंघातील 17 जिल्हा परिषद मतदारसंघांसह तिन्ही शहरांमध्ये योगाचे कार्यक्रम आयोजित करण्याबरोबरच विविध ठिकाणी योगा सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सांगितले.

सावंतवाडी येथील मांगिरीश हॉलमध्ये फिटनेस योग फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित योग प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या योग शिक्षकांना विशाल परब यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे योग हा केवळ व्यायामाचा प्रकार न राहता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला पाहिजे, असे परब यांनी नमूद केले. ग्रामीण आणि शहरी भागांत योगाविषयी जनजागृती करून अधिकाधिक नागरिकांना योगाभ्यासासाठी प्रोत्साहित करण्यात येईल. तसेच स्थानिक पातळीवर योगा सेंटर सुरू करून नागरिकांना नियमित योगाभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला योग प्रशिक्षक शेखर बांदेकर, संस्थेचे यशवंत आरोसकर, शिवा गावडे, निशिगंधा सावंत, रेवती सावंत तसेच योग प्रशिक्षण शिबिरातील सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.