
देशभरातील तब्बल ५८ इंजिनिअरिंग आणि तंत्रशिक्षण महाविद्यालयांनी नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केल्याने ती कायमची बंद करण्याचा निर्णय ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने घेतला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे महाविद्यालये बंद होण्याच्या या यादीत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही दोन्ही राज्ये अव्वलस्थानी आहेत. बंद करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील १२ आणि उत्तर प्रदेशातील १२ महाविद्यालयांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयांमध्ये ‘प्रोग्रेसिव्ह क्लोजर’ अर्थात टप्प्याटप्प्याने बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विविध महाविद्यालयांमधील तब्बल १५० पेक्षा जास्त अभ्यासक्रम देखील कायमचे बंद करण्यात आल्याची माहिती एआयसीटीईने प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
ज्या महाविद्यालयांची नावे यादीत आहेत, त्यांना यापुढे प्रथम वर्षासाठी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. मात्र, जे विद्यार्थी आधीपासूनच तेथे शिक्षण घेत आहेत, त्यांना शिक्षण पूर्ण करण्याची पूर्ण परवानगी असेल. त्यांच्या शैक्षणिक हिताचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
निर्णय घेण्याचे कारण काय?
एआयसीटीई ही देशातील तंत्रशिक्षणाचे नियमन करणारी सर्वोच्च संस्था आहे.
काही वर्षांपासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली.
आवश्यक पात्र प्राध्यापक टिकवून ठेवण्यात अनेक महाविद्यालये अपयशी ठरली.
लायब्ररी, लॅब आणि इतर पायाभूत सुविधांच्या नियमांचे पालन झाले नाही.
नियमांचे पालन करण्याबाबत दिलेल्या सूचनांकडे संबंधित महाविद्यालयांनी दुर्लक्ष केले.
तीन सरकारी अनुदानित महाविद्यालयांचाही समावेश
बंद झालेल्या ५८ संस्थांपैकी बहुसंख्य खाजगी महाविद्यालये आहेत. एकूण संस्थांपैकी फक्त ३ सरकारी अनुदानित, तर उर्वरित सर्व खाजगी आहेत.
राज्यनिहाय बंद करण्यात आलेली महाविद्यालये :
महाराष्ट्र – १२
उत्तर प्रदेश – १२
मध्य प्रदेश – ८
तेलंगणा – ४
पंजाब – ४
आंध्र प्रदेश – ३
राजस्थान – ३
गुजरात – २
कर्नाटक – २
तामिळनाडू – १
हरियाणा – १
ओडिशा – १
उत्तराखंड – १
पश्चिम बंगाल – १
अशा प्रकारे देशभरातील एकूण ५८ अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण महाविद्यालये बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.





