ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कॅन्सरच्या धोक्यामुळे मुलचेरा तालुक्यात मथुरानगरमध्ये खराविक्री बंद

मुलचेरा,  :


तंबाखू आणि खरा सेवनामुळे होणाऱ्या कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा वाढता धोका लक्षात घेऊन मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मथुरानगर येथील ग्रामस्थांनी गावात ‘खरा’ आणि सर्व प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. विशेष म्हणजे, या गावात गेल्या १२ वर्षांपासून अवैध दारूविक्रीसुद्धा पूर्णपणे बंद असून, आता व्यसनमुक्तीच्या दिशेने गावाने मोठे पाऊल टाकले आहे.
तंबाखूमध्ये असणाऱ्या घातक कर्करोगजन्य रसायनांमुळे अनियंत्रित पेशी वाढतात, त्याचे रूपांतर पुढे कॅन्सरमध्ये होते. शासनाने तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली असली, तरी चोरट्या मार्गाने किराणा दुकाने किंवा पानटपऱ्यांवर खरा उपलब्ध होत असल्याने रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मथुरानगर गावातही खरा व तंबाखू सेवनामुळे ३ रुग्णांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ही गंभीर व जीवघेणी समस्या समोर येताच संपूर्ण ग्रामस्थ जागरूक झाले.
गावातील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी एकत्र येत गावात खरा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील दुकानदारांनी स्वतःहून खराविक्री पूर्णपणे बंद केली आहे. सध्या गावात एकाही दुकानात तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध होत नसल्याने, खरा प्रेमींचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
‘मुक्तिपथ’ अभियानाच्या वतीने गावात ‘शक्तिपथ पाऊलखुणा बैठक’ आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ग्रामस्थ व महिलांनी गावातील या सकारात्मक बदलाची माहिती दिली. गावात गेल्या अनेक वर्षांपासून असलेली दारूविक्रीबंदी आणि आता झालेली खराबंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी मुक्तिपथच्या वतीने महिलांना संघटित करण्यात आले.
तसेच अवैध दारूविक्री पुन्हा सुरू होऊ नये यासाठी कायदेशीर उपाययोजना समजावून सांगण्यात आल्या. यासोबतच तंबाखू व खरा सेवनाचे आरोग्यावर होणारे भीषण परिणामही उपस्थितांना पटवून देण्यात आले.
गावातील या निर्णयाची मैदानी पातळीवर प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुक्तिपथचे तालुका संघटक रूपेश अंबाडे व त्यांचे चमू वेळोवेळी पाठपुरावा बैठक घेऊन ग्रामस्थांमध्ये सातत्याने जनजागृती करत आहे.