
अहेरी, प्रतिनिधी :अहेरी येथील १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता, रिक्त पदे आणि विस्कळीत झालेल्या आरोग्य सेवेच्या प्रश्नाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानंतर अवघ्या काही तासांत आरोग्य विभागाचे विशेष पथक अहेरी येथे दाखल झाले असून, रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी सुरू करण्यात आली आहे.
मुंबईतील विधानभवनात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, विकास उईके, मुकेश नामेवार आणि संजय पोहणेकर यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन अहेरी महिला व बाल रुग्णालयातील गंभीर परिस्थिती मांडली होती. डॉक्टरांचे राजीनामे, तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा, रिक्त पदे आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी सविस्तर निवेदन सादर केले.
या निवेदनाची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानंतर काही तासांतच आरोग्य विभागाचे विशेष पथक अहेरी येथे पोहोचले. अहेरीत दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. भाजपचे तालुकाध्यक्ष विकास तोडसाम यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन रुग्णालयातील वास्तविक परिस्थिती निदर्शनास आणून दिली.
सध्या विशेष पथक रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळाची उपलब्धता, रिक्त पदांची स्थिती, उपचार व्यवस्था आणि प्रशासनासमोरील अडचणींचा प्रत्यक्ष आढावा घेत आहे. रुग्णालय प्रशासन, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील आरोग्य सेवेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या प्रश्नावर भाजपने सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यानंतर शासनाने तातडीने पावले उचलल्याचे दिसून येत आहे.
विशेष पथकाच्या या भेटीनंतर रुग्णालयातील रिक्त पदे भरणे, तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करणे आणि आरोग्य सेवा पूर्ववत करण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता पाहणी अहवालाच्या आधारे शासन कोणते ठोस निर्णय घेते, याकडे अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





