सचिवपदी अशोक कुम्मरी, तर उपाध्यक्षपदी मुजफ्फर खान यांची वर्णी; पाचव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा
सिरोंचा : पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपत गेल्या चार वर्षांपासून तालुक्यात सक्रिय असलेल्या ‘सिरोंचा तालुका पत्रकार संघटने’च्या पाचव्या वर्षातील नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये संघटनेच्या अध्यक्षपदी सागर मूलकला यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली, तर सचिवपदी अशोक कुम्मरी आणि उपाध्यक्षपदी मुजफ्फर खान यांची एकमताने निवड झाली.
संघटनेच्या गेल्या चार वर्षांच्या देदीप्यमान कामगिरीचा आढावा घेत आगामी काळातील धोरणांवर या बैठकीत सखोल चर्चा झाली. सर्वच पत्रकार बांधवांनी एकजूट दाखवत सागर मूलकला यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आणि त्यांची बिनविरोध निवड केली. त्याचप्रमाणे सचिव आणि उपाध्यक्ष पदाची धुराही अनुक्रमे अशोक कुम्मरी व मुजफ्फर खान यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली.
निवड जाहीर होताच उपस्थित पत्रकारांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पहार घालून जंगी स्वागत केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संघटनेची एकजूट अभेद्य ठेवणे, पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न प्रशासनादरबारी आक्रमकपणे व प्रभावीपणे मांडणे आणि तालुक्यातील बहुप्रतीक्षित ‘पत्रकार भवनाचा’ प्रश्न मार्गी लावण्यासाठी निर्णायक लढा देण्याचा ठाम निर्धार नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला.
गेल्या चार वर्षांत सामाजिक उपक्रम आणि निर्भीड पत्रकारितेच्या बळावर या संघटनेने सिरोंचा तालुक्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता पाचव्या वर्षात पदार्पण करताना या नव्या आणि ऊर्जावान नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक व्यापक आणि गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या निवड सभेला श्याम बेजानीवर, मुरलीधर मारगोनी, सत्यम गोरा, रवी सल्लम, रामचंद्र कुम्मरी, सुरेश त्रिपतीवार, रवी येमुर्ला, वेंकटस्वामी चकिनाला, सुधाकर सिडाम, संपत अंबाला, रवीकुमार मल्लेमपल्लीवार , देवेंद्र रंगूवार, महेश अगुला, चंद्रू पुलगाम यांच्यासह तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





