अहेरी येथील ऐतिहासिक रुक्मिणी महालात युवानेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम यांचा जन्मदिन थाटात साजरा
राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्या हस्ते औक्षण; राजपरिवार, धर्मराव शिक्षण मंडळाचे कर्मचारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती.
अहेरी:- अहेरी इस्टेटचे राजकुमार युवानेते तथा राजे धर्मराव शिक्षण मंडळाचे सचिव कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांचा जन्मदिन अहेरी येथील ऐतिहासिक रुक्मिणी महालात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त राजमहालात शुभेच्छा देण्यासाठी राजपरिवारातील सदस्य, विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
या प्रसंगी राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांनी कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले. राजे अम्ब्रिशराव महाराज यांनीही बाबांना वाढदिवसानिमित्य शुभेच्छा दिल्या.त्यानंतर केक कापून जन्मदिन साजरा करण्यात आला. उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी त्यांची भेट घेत आपुलकी व्यक्त केली. कुमार अवधेशराव बाबा यांनीही उपस्थितांशी संवाद साधत सर्वांचे आभार मानले.
कुमार अवधेशराव बाबा आत्राम हे अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांचे लहान बंधू असून, राजे धर्मराव शिक्षण मंडळाचे सचिव म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षण मंडळाच्या वतीनेही विशेष उपस्थिती नोंदविण्यात आली. मंडळाचे मुख्याध्यापक, शिक्षक, आणि कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
जन्मदिनाचे औचित्य साधून राजमहालाच्या भव्य पटांगणावर नाईट ऑर्केस्ट्रा या संगीत कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अहेरी नगरीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे जन्मदिन सोहळ्यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमानेही अहेरीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम, राजमाता राणी रुक्मिणीदेवी, प्रवीणरावबाबा आत्राम यांच्यासह राजपरिवारातील सदस्य, राजे धर्मराव शिक्षण मंडळाचे कर्मचारी, भाजप व नावीसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुभेच्छा, आशीर्वाद आणि सांस्कृतिक उत्सवाची सांगड घालत ऐतिहासिक रुक्मिणी महालात कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांचा जन्मदिन सोहळा उत्साहात पार पडला.






