सिरोंचा शहरात आपल्या उत्कृष्ट कामाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारे किरण भाऊ पेंटर आज अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या किरण भाऊंनी लहान वयातच घरच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी संघर्षमय प्रवास सुरू केला.

शिकण्याची प्रचंड आवड असतानाही परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणासोबत कामाची वाट निवडावी लागली. पेंटिंगचे काम शिकण्यासाठी ते आलापल्ली येथे आपल्या मामाच्या घरी राहिले. तिथे भावासोबत मेहनत घेत त्यांनी पेंटिंगचे बारकावे आत्मसात केले.
काम शिकून स्वगावी सिरोंचाला परतल्यानंतर त्यांनी छोट्या-छोट्या कामांपासून सुरुवात केली. आपल्या एकनिष्ठ मेहनतीमुळे, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट कामाच्या गुणवत्तेमुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसू लागला. हळूहळू मोठ्या कामांची जबाबदारीही लोक विश्वासाने त्यांच्याकडे सोपवू लागले.
विशेष म्हणजे, किरण भाऊंनी हे काम फक्त स्वतःपुरते मर्यादित ठेवले नाही. गावातील अनेक युवकांना पेंटिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःसोबत पार्टनर म्हणून जोडले. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल २० ते ४० युवक काम करत असून अनेकांना रोजगाराची संधी मिळाली आहे.
आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी बहिणीचे लग्न केले, लहान भाऊ व बहिणीला उच्च शिक्षणासाठी मदत केली तसेच आई-वडिलांना आर्थिक आधार दिला. संघर्ष, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर उभा राहिलेला हा प्रवास आज सिरोंच्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
आज “किरण भाऊ पेंटर” हे नाव केवळ पेंटिंग व्यवसायापुरते मर्यादित नसून मेहनत, प्रामाणिकपणा आणि समाजातील युवकांना रोजगार देणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात आहे.





