गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

महिला व बाल रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सुविधांची आयुक्त संजय काटकर यांच्याकडून उच्चस्तरीय प्रत्यक्ष पाहणी

प्रसूती झालेल्या माता, रुग्णांचे नातेवाईक आणि आशा स्वयंसेविकांशी साधला थेट संवाद

गडचिरोली, दि. १० जुलै (जिमाका) : राज्यातील आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, रुग्णाभिमुख आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई मा. संजय काटकर यांनी काल गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन विविध आरोग्य सुविधांची उच्चस्तरीय प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णसेवेचा दर्जा, औषधांचा पुरवठा, स्वच्छता, रुग्णांना दिला जाणारा आहार, अतिदक्षता विभागातील सुविधा तसेच आपत्कालीन आरोग्य सेवेचा सविस्तर आढावा घेतला.

महिला व बाल रुग्णालयात आयुक्तांनी नवजात शिशू अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया कक्ष, प्रसूती वॉर्ड तसेच जिल्हा लवकर निदान केंद्र यांना भेट देऊन उपचार व्यवस्था आणि उपलब्ध वैद्यकीय उपकरणांची माहिती घेतली. रुग्णालयातील विभागनिहाय स्वच्छता, रुग्णसेवेतील शिस्त आणि व्यवस्थापनाची त्यांनी पाहणी केली. रुग्णालयाची एकूण व्यवस्था समाधानकारक असल्याची दखल घेत त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या कार्याचे कौतुक केले.

यानंतर आयुक्तांनी प्रसूती झालेल्या मातांच्या वॉर्डात जाऊन त्यांची विचारपूस केली. उपचार, औषधे, भोजन आणि इतर सुविधा वेळेवर मिळत आहेत का, याबाबत त्यांनी आस्थेने संवाद साधला. याचवेळी रुग्णांच्या नातेवाईकांशी तसेच शासकीय कामासाठी आलेल्या आशा स्वयंसेविकेशीही त्यांनी थेट चर्चा करून शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याची माहिती जाणून घेतली.

त्यानंतर त्यांनी रुग्णालयाच्या मुख्य औषध भांडाराची पाहणी करून आवश्यक औषधसाठ्याची उपलब्धता तपासली. रुग्णांना आवश्यक औषधे वेळेवर आणि विनामूल्य उपलब्ध होणे ही आरोग्य यंत्रणेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर रुग्णांसाठी भोजन तयार होणाऱ्या स्वयंपाकगृहाची पाहणी करून स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि पोषणमूल्यांची माहिती घेतली.

रुग्णालय परिसर स्वच्छ व सुस्थितीत राखल्याबद्दल तसेच रुग्णांना दर्जेदार भोजन उपलब्ध करून दिल्याबद्दल आयुक्त संजय काटकर यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचारी आणि स्वयंपाकगृह निरीक्षक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तळागाळातील कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

महिला व बाल रुग्णालयाच्या पाहणीनंतर आयुक्तांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन अतिदक्षता विभागाची पाहणी केली. गंभीर रुग्णांवरील उपचार, उपलब्ध यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाची माहिती त्यांनी घेतली. तसेच ‘१०२’ आणि ‘१०८’ रुग्णवाहिकांची प्रत्यक्ष तपासणी करून त्या आवश्यक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असून कार्यक्षम अवस्थेत असल्याची खात्री करून घेतली.

या क्षेत्रीय पाहणी दौऱ्यावेळी आरोग्य सेवा, नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, परिचारिका आणि कर्मचारी उपस्थित होते.